106 सूरह क़ुरैश

अल्लाहच्या नावाने,जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

1 ज्याअर्थी कुरैश सरावले
2 (अर्थात) हिवाळ्याच्या व उन्हाळ्याच्या प्रवासांना सरावले,
3 त्याअर्थी त्यांना हवे की या घराच्या पालनकर्त्याची उपासना करावी
4 ज्याने त्यांना भूकेपासून वाचवून, खायला दिले, आणि भयापासून वाचवून शांती प्रदान केली.

107 सूरह अल्माऊन

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

1 तुम्ही पाहिले त्या माणसाला जो परलोकातील मोबदला व शिक्षेला खोटे ठरवितो?
2 तोच तर आहे जो अनाथाला धक्के देतो
3 आणि गरिबांना जेवण देण्यासाठी उत्तेजन देत नाही.
4 मग विनाश आहे त्या नमाज पढणार्‍यांसाठी
5 जे आपल्या नमाजात गफलत करतात.
6 जे दिखाऊपणा करतात,
7 आणि क्षुल्लक गरजेच्या वस्तू (लोकांना) देण्यास टाळाटाळ करतात.

108 सूरह अल्कौसर

अल्लाहच्या नावाने,जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

1 (हे पैगंबर (स.)) आम्ही तुम्हाला कौसर प्रदान केले.
2 म्हणून तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठीच नमाज पढा व कुर्बानी करा,
3 तुमचा शत्रूच संततीहीन आहे.

109 सूरह अल्काफ़िरून

अल्लाहच्या नावाने,जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

1 सांगा की, हे अश्रद्धावंतांनो
2 मी त्यांची उपासना करीत नाही ज्यांची उपासना तुम्ही करता.
3 आणि न तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो.
4 आणि न मी त्यांची उपासना करणारा आहे ज्यांची उपासना तुम्ही केली आहे.
5 आणि न तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो.
6 तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.

110 सूरह अन्नस्र

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

1 जेव्हा अल्लाहची मदत आली आणि विजय प्राप्त झाला
2 आणि (हे पैगंबर स.) तुम्ही पाहिले की लोक झुंडी झुंडीने अल्लाहच्या धर्मात प्रवेश करीत आहेत
3 तेव्हा आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्य गान करा, आणि त्याच्याकडे क्षमेची प्रार्थना करा. निःसंदेह तो मोठा पश्चात्ताप स्वीकारणारा आहे.

111 सूरह अल्लहब

अल्लाहच्या नावाने,जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

1 तुटून गेले अबू लहबचे हात आणि विफल झाला तो.
2 त्याची मालमत्ता आणि जे काही त्याने कमविले ते त्याच्या काहीच उपयोगी पडले नाही.
3 अवश्य तो उसळत्या ज्वालांच्या अग्नीत टाकला जाईल
4 आणि (त्याच्याबरोबर) त्याची पत्नीसुद्धा.
5 आगलावेपणा करणारी, तिच्या मानेत अग्निचा तळपता दोर असेल.

112 सूरह अल्इख़्लास

अल्लाहच्या नावाने,जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
1 सांगा, तो अल्लाह आहे एकमेव.
2 अल्लाह सर्वांपासून निरपेक्ष आहे आणि सर्व त्याचे गरजवंत आहेत.
3 न त्याची कुणीही संतती आहे आणि न तो कोणाची संतती.
4 आणि कुणी त्याच्या समान नाही.

113 सूरह अल्फ़लक़

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

1 सांगा, मी शरण मागतो सकाळच्या पालनकर्त्याची,
2 त्या प्रत्येक वस्तूच्या अरिष्टापासून जी त्याने निर्माण केली आहे
3 आणि रात्रीच्या अंधाराच्या अरिष्टापासून जेव्हा की तो पसरतो,
4 आणि गंड्यांत फुंकणार्‍यांच्या अरिष्टापासून
5 आणि मत्सर करणार्‍यांच्या अरिष्टापासून जेव्हा ते मत्सर करतात.

114 सूरह अन्नास

अल्लाहच्या नावाने,जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

1 सांगा, मी शरण मागतो मानवांच्या पालनकर्त्यापाशी,
2 मानवांच्या बादशाहपाशी,
3 मानवांच्या खर्‍या ईश्वरापाशी,
4 त्या दुष्प्रवृत्त करणार्‍याच्या अरिष्टापासून जो पुन्हा पुन्हा परतून येतो,
5 जो लोकांच्या मनात दुष्प्रवृत्ती निर्माण करतो,
6 मग तो जिन्नांपैकी असो की मानवांपैकी.